नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (सोमवार) कोरोनावर लस विकसित करणाऱ्या तीन कंपन्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. शनिवारी मोदींनी व्हॅक्सिन दौरा करत गुजरात, पुणे आणि तेलंगणा राज्यातील फार्मा कंपन्यांना भेट देवून लस विकासाची माहिती घेतली. उद्या मोदी आणखी तीन कंपन्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाने ट्विटकरून दिली आहे.
तीन टीमसोबत मोदींची चर्चा
कार्यालयाच्या अधिकृत वक्तव्यानुसार, पंतप्रधान मोदी जिनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांशी संवाद साधणार असून लस निर्मितीची माहिती घेणार आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या संशोधक आणि अधिकाऱ्यांच्या पथकांबरोबर मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणार आहेत.
तीन राज्यांचा व्हॅक्सिन दौरा
काल (शनिवार) मोदींनी गुजरात राज्यातील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम कंपनीला भेट दिली. तिन्ही ठिकाणी लस विकासित करण्याचे काम कसे सुरू आहे, याची सखोल माहिती मोदींनी घेतली. लस निर्मितीस किती काळ लागेल, तयार लसींची साठवणूक, वाहतूक, लसीकरणाचे नियोजन कसे असेल, यावर मोदींनी सखोल चर्चा केली. लवकरात लवकर लस बाजारात यावी, अशी अपेक्षा मोदींनी पुणे येथे अदर पुनावाला यांच्याशी बोलताना व्यक्त केली.