नवी दिल्ली - तिसऱ्या लॉकडाऊनचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे. मागील ४९ दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक, बाजारपेठासह सर्वकाही ठप्प आहे. अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खायला लागली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज(सोमवार) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.
राज्यांकडील उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. आज बैठकीत अर्थव्यवस्था हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला जाण्याची शक्यता आहे. त्यासह ग्रीन, ऑरेंज, आणि रेड झोनबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे २४ मार्चपासून पाचव्यांदा पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रे खुली करण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. तर लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे होणारे संभाव्य फायदे आणि तोट्यांचे गणितही चर्चेत मांडण्यात येईल. मात्र, तरीही निर्बंध राहण्याची शक्यता असून एकाचवेळी सर्व निर्बंध हटविले जाणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
आज दुपारी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरंन्सिंग सुरु होणार आहे. या बैठकीत काय चर्चा होते, याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही कमी होत नाही. ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण देशात आढळून आले असून २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल(रविवारी) दिवसभरात देशात ३ हजार २७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.