नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हीडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून जम्मू काश्मीरसह 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.
दरम्यान मंगळवारी पंजाब, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंड, ईशान्येकडील राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला होता. यात एकूण 21 केंद्रशासित राज्य आणि घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. दरम्यान आज होणाऱ्या चर्चेत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे मोदींकडे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी शिथील करण्याची मागणी करणार आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्याशी ते बोलणार आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत. आशावेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, सॅनेटायझर लावणं, बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय धुणे, हँडवॉशचा वापर करवा, असे सल्ले मोदींनी मंगळवारी झालेल्या चर्चेत दिले होते.