नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेल्या 'नॅशनल वॉर मेमोरियल'चे उद्घाटन करणार आहेत. देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.
या स्मारकाला १७६ कोटी रुपये इतका खर्च आला असून तब्बल ४० एकर परिसरात हे स्मारक बांधण्यात आले आहे. या राष्ट्रीय युद्ध स्मारकात त्या सर्व सैनिकांच्या नावांचा समावेश आहे, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशासाठी बलिदान दिलेले आहे. इंडिया गेटच्या अगदी समोर हे स्मारक उभारण्यात आले आहे. आतापर्यंत वीरमरण आलेल्या जवळपास २५ हजारांहून अधिक जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.
स्वातंत्र्यानंतर हे स्मारक बांधण्याची मागणी होती. मोदी याठिकाणी जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या कुटुंबीयांशीही मोदी संवाद साधतील.