नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यामध्ये त्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली. देशात सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना धन्यवाद करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. लॉकडाऊनला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी लोकांचे आभार मानले. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळेच देशाला कोरोनाचा अद्याप मोठ्या प्रमाणात फटका बसला नसल्याचे त्यांनी नागरिकांना उद्देशून म्हटले.
बाबासाहेब आंबेडकरांना केले नमन..
देशातील लोक ज्याप्रमाणे एकत्र येऊन कोरोनाला लढा देत आहेत. ते पाहून संविधानातील 'आम्ही भारताचे लोक' या उक्तीचा प्रत्यय येत असल्याचे ते म्हटले. हा एकत्रित लढा हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली असल्याचे ते म्हटले.
देशातील परिस्थिती इतर देशांहून चांगली..
देशात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, त्यापूर्वीच देशाने विमानतळांवर स्क्रीनिंग सुरु केली होती. देशातील कोरोनाचे रुग्ण १००ही झाले नव्हते, त्यापूर्वीच आपण मॉल आणि विमानतळे बंद केली होती. तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यास सुरूवात केली होती. तसेच देशात कोरोनाचे केवळ ५५० रुग्ण होते, तेव्हाच देशाने २१ दिवसांचा ऐतिहासिक लॉकडाऊन लागू केला होता.
ही समस्या वाढण्याची वाट देशाने पाहिले नाही. देशाने त्यापूर्वीच तिच्याशी लढण्यासाठी पावले उचलली होती. त्यामुळेच जगभरातील प्रगत राष्ट्रांहूनही चांगल्या परिस्थितीमध्ये भारत आहे. देशाने कठोर पावले उचलली नसती, वेळेवर योग्य ते निर्णय घेतले नसते, तर आज आपल्या देशातही या देशांप्रमाणे हजारो निष्पाप लोकांचे दुर्देवी बळी गेले असते.
लॉकडाऊनमध्ये वाढ..
जगभरातील सर्व लोक कोरोनाविरुद्ध पावले उचलत असतानाही कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याबाबत काय करता येईल, याबाबत मी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांच्याकडून एक समान पर्याय सुचवला गेला. तसेच, देशातील जनतेचाही तोच विचार होता - तो म्हणजे लॉकडाऊनमध्ये वाढ. त्यामुळे देशातील लॉकडाऊन कालावधी हा ३ मे पर्यंत वाढवण्यात येत आहे.
हेही वाचा : 3 कोटीपेक्षा जास्त भारतीय वापरतात आरोग्य सेतू अॅप