नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी भारताची निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सत्रात बीजभाषण करणार आहेत. न्यूयॉर्क मधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार 9.30 ते 11.30 दरम्यानच्या सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलतील. मोदी यांच्यासोबत नॉर्वेचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गटेरेस भाषण करतील.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या उच्चस्तरीय वार्षिक परिषदेत विविध देशातील खाजगी क्षेत्र, नागरी समाज, तज्ञ सहभागी होतात. संयुक्त राष्ट्राचे ७५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड:१९ नंतरची बहुपक्षीयता या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे जागतिक वातावरण बदलले आहे. अशा संकटाच्या काळात बहुपक्षीय सहकार्य, जागतिक संस्थांचे बळकटीकरण, कणखर नेतृत्व यांच्या द्वारे जगातील नागरिकांचा विकास कसा करता येईल यावर चर्चा होईल.
दोन वर्षांसाठी भारताला अस्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या वतीने आयोजित महत्वाच्या परिषदेत संबोधित करणार आहेत. यामुळे भारताच्या स्थायी सदस्यत्वाबद्दलची प्राथमिकता दिसून येते. मोदी यांनी 2016 मध्ये या परिषदेला संबोधित केले होते.
संयुक्त राष्ट्राच्या रचनेतील आर्थिक आणि सामाजिक परिषद महत्वाची मानली जाते. याची पहिली परिषद 23 जानेवारी 1946 साली झाली होती.त्या परिषदेचे आयोजन भारताच्या अध्यक्षतेखाली झाले होते. सर रामस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली होती.