नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेच्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला आज सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे कामकाज निकोप आणि लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. संसदेबाहेर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
देशाच्या इतिहासात फार कमी वेळा लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा बहुमत देत देशाने एखाद्या सरकारला संधी दिली आहे. तसेच गेल्या वेळेसपेक्षा जास्त बहुमताने यावेळी जनतेने आम्हाला निवडणून दिले आहे. गेल्या लोकसभेचा अनुभव आमच्यासमोर आहे. संसदेच्या कमाकाजात कितीही गोंधळ झाला तरी जनहिताची विधेयके आम्ही पारित केली, असे मोदींनी यावेळी सांगितले.
लोकशाहीत विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. विरोधकांनी त्यांच्या संख्याबळाचा विचार करू नये. त्यांनी त्यांची बाजू मांडावी. आमच्यासाठी विरोधकांचा प्रत्येक शब्द मौल्यवान आहे. लोकसभेचा सदस्य असलेल्या व्यक्तीने नि:पक्षपणे आपली मते मांडावी. मला विश्वास आहे की नि:पक्षणे लोककल्याणाला प्रधान्य देत आम्ही या सदानाची गरिमा कायम राखू. आम्हाला विश्वास आहे, की गेल्या कार्यकालापेक्षा या येत्या कार्यकाळात जास्त प्रभावशाली आणि जनहिताच्या कामात अधिकाधिक उर्जा, गतिमानता आणि सामुहिक विकासाचे निती याची प्रचिती येईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मोदींनी माध्यमांनाही काही सुचना केल्या. काही सदस्य सभागृहात महत्वपूर्ण विषय मांडतात. मात्र, त्यांचे विषय विस्तृत असतात. हे विषय मनोरंजक नसल्याने त्यातून टीआरपी मिळत नाही. त्यामुळे माध्यमांचे त्याकडे दुर्लक्ष होते. तेव्हा त्या सदस्यांच्या विचारांना योग्य न्याय मिळत नाही. तसेच एखादी विरोधी पक्षातील व्यक्तीही सरकारवर योग्य मुद्द्यांच्या आधारे टीका करू शकते. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया बळकट होण्यास मदत होते. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी माध्यमांनी सकारात्मक पद्धतीने सहकार्य करावे, असे आवाहन मोदींनी केले.