हैदराबाद - भारत-चीन तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे. ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते. जर पंतप्रधान मोदी प्रत्येक महत्त्वाच्या विषयांवर देशाला संबोधित करत असतील, तर त्यांनी भारत-चीन हा विषयही महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
ईटीव्ही भारतसोबत बोलताना चौधरी यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेले आत्मनिर्भर पॅकेज, प्रवासी मजूर आणि सध्या देश ज्या संकटांना तोंड देत आहे, आदी विषयांवर संवाद साधला.
लडाख, लॉकडाऊन आणि प्रवासी मजदूर -
भारत आणि चीनदरम्यानच्या लडाखच्या पूर्व क्षेत्रावर तणाव सुरू आहे. गेल्या एका महिन्यापासून पंतप्रधान इतक्या महत्त्वाच्या क्षेत्रावर मौन बाळगून आहेत. या विषयाशी संबंधित सैन्यदलाकडून केंद्र सरकारला इशारा देण्यात येत आहे. याविषयावर काय होत आहे? हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. सरकारने हे समजून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांसाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेबाबत ते म्हणाले, की यातून रेल्वेची गैरव्यवस्था व ढिसाळ नियोजन दिसून आले. कोरोनाच्या या संकटात प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या दुर्देशेकडे रेल्वेने लक्ष दिले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. याचेच परिणाम म्हणून 90 लोकांचा मृत्यू झाला, असेही ते यावेळी म्हणाले. म्हणून ही परिस्थिती बघता 'डेथ पार्लर' ही संज्ञा आपण वापरू शकतो असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारच्या ढसाळ नियोजनावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकार या मजूरांच्या समस्येबाबत गंभीर नाही. अनेक लोक गावी परत जात आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून त्यांची समजूत घातली नाही. हे सर्व सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला. या अनियोजित लॉकडाऊनमुळे देशाची प्रतिमा डागाळली आहे, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत या पॅकेजवरही चौधरी यांनी टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकार त्यांच्या मोठ्या भाषणासाठी आणि वचनांसाठी प्रसिद्ध आहे. केंद्र सरकार या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला तोंड देण्यासाठी जीडीपीच्या केवळ 1 टक्के वाटप करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. अनेक पॅकेजमध्ये काही नसते. मात्र, त्या आधीच्या पॅकेजमध्ये सुधारणा करून नवीन घोषणा करण्यात येते. देशातील गरीब जनतेच्या खात्यावर 10 हजार रूपये जमा करा आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी प्रतिमहिना 7 हजार 500 रूपये जमा करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस वारंवार करत आहे. यामुळे लोकांच्या हातात पैसा येईल आणि थोडी परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी खूप आधीपासून यावर बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या आधी 3.1 टक्के दर आपल्या आर्थिक वाढीची अवस्था दर्शवतो. कोरोनाच्या आधीच्या देशातील बेरोजगारीचा दर 8.5 टक्के होता. जो मागील 42 वर्षातील निचांक होता. सध्या तो 27 टक्क्यांवर आहे. निर्यातही मंदावली आहे. फक्त कृषी क्षेत्रांत थो़ड्या प्रमाणात थोडी वाढ दिसत आहे आणि सार्वजनिक प्रशासनांवर काही खर्च झाला आहे. आपण आपली अर्थव्यवस्था 'कोरोनाच्या आधी आणि नंतर' अशा दोन भागात विभागली पाहिजे. त्यानंतर प्रत्येकासमोर योग्य चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. कोरोना विषाणू सध्याची आर्थिक परिस्थितीला जबाबदार नाही. आधीपासून आपली अर्थव्यवस्था संकटात आहे. आम्ही देशाची अर्थव्यवस्था आणि आणि केंद्राची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.