नवी दिल्ली - कोरोनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाऊनला मागे सोडून अनलॉक फेज १मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेला मजबूत करणे सरकारचे प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. त्यामुळे भारत निश्चितच विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते भारतीय उद्योग संघाला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यावेळी मोदी यांनी अनेक आर्थिक विषयांवर भाष्य केले.
मोदी म्हणाले, 'भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नॉलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चितच विकासाच्या मार्गावर परतेल.'
'कोरोनामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाऊनला मागे सोडून अनलॉक फेज १मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरू झाला आहे. ८ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल. अर्थव्यवस्थेला मजबूत करणे सरकारचे प्राधान्य आहे. यासाठी केंद्र सरकार विविध निर्णय घेत आहे. यामध्ये तातडीच्या निर्णयासोबतच दीर्घकालीन फायदा देणाऱ्या निर्णयांचाही समावेश असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
जगभरात कोरोनाचे थैमान सुरू होते. त्यावेळी भारताने मोठे निर्णय घेतले, वेळीच लॉकडाऊन लागू केले. या काळात आपल्या सुविधांमध्ये वाढ केली. त्यामुळेच जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे, असेही मोदी यांनी सांगितलं.
'पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत आतापर्यंत ७४ कोटी लोकांना रेशन दिले आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य दिले. आतापर्यंत गरीब कुटुंबाच्या खात्यावर ५३ हजार कोटी रुपये टाकण्यात आले आहेत,' असेही मोदी यांनी नमूद केले.