नवी दिल्ली - यावर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ११व्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना झाले आहेत.
जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांदरम्यान ही परिषद होते. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. यावर्षी होणाऱ्या ब्रिक्स परिषदेची थीम आहे, 'नाविन्यपूर्ण भविष्यासाठी आर्थिक प्रगती'.
पंतप्रधान मोदी हे उद्या (बुधवार) सकाळी ब्राझिलियामध्ये पोहोचतील. परिषदेच्या पहिल्या दिवशी ते विविध देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, ब्रिक्स व्यापार मंचाच्या समारोप सोहळ्यासही ते उपस्थित राहतील. व्यापार संबंधीचे परराष्ट्र सचिव टी. एस. तिरूमूर्ती यांनी ही माहिती दिली.
या परिषदेला भारतातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादविरोधी क्षेत्रात ब्रिक्सला गॅल्वनाइझ करण्यासाठी अनेक वर्षांत भारताने पुढाकार घेतला आहे. केवळ दहशतवादविरोधी कठोर भूमिका न घेता, दहशतवादाशी संबंधित विशिष्ट बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठीही भारताने मोलाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा : भारताशिवाय 'आरसीईपी' कमकुवत..