नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या या वर्षातील पहिल्या 'मन की बात' कार्यक्रमात केरळमधील एका दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीची स्वच्छता करण्यासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली.
पंतप्रधान म्हणाले, 'केरळमधील आणखी एक बातमी मला सांगाविशी वाटते. ही ज्या व्यक्तीची आहे, त्यांचे कार्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देते. केरळच्या कोट्टायममध्ये एक दिव्यांग वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्यांचे नाव एन. एस. राजप्पन आहे. अर्धांगवायू झाल्यामुळे ते चालण्यास असमर्थ आहेत. परंतु स्वच्छतेबाबतची त्यांची बांधिलकी कमी झालेली नाही.'
हेही वाचा - मन की बात : '२६ जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण देश दु:खी'
'गेल्या कित्येक वर्षांपासून, ते वेंबनाड तलावामध्ये आपली नाव फिरवितात आणि तेथे पडलेल्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्या साफ करतात. ते किती उच्च दर्जाचा विचार करतात, याची कल्पना करा! राजप्पनजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही शक्य तितक्या प्रमाणात स्वच्छतेसाठी हातभार लावला पाहिजे,' असे ते पुढे म्हणाले.
'मन की बात' हा पंतप्रधानांसाठीचा मासिक रेडिओ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता प्रसारित केला जातो.
हेही वाचा - देशाची वाढती तहान : जुन्या होत चाललेल्या धरणांची डोकेदुखी