नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) तब्बल 1.75 लाख घरांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. ही घर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आधार आहेत. येथून तुम्ही आपल्या नव्या जीवनाची सुरवात करा, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी जोपर्यंत लस येत नाही. तोपर्यंत लोकांनी कोरोनापासून सावध रहावे, असा सल्ला यावेळी मोदींनी देशवासियांना दिला.
आपल्या मुलांना, आपल्या कुटूंबाला नवीन उंचीवर न्या. आपण पुढे गेल्यास देशही पुढे जाईल. ही केवळ घरे बांधण्याची योजना नाही. या योजनेचे उद्दीष्ट हे आहे की, गरीब लोकांनी घर, वीज, पाणी, इंधन यासारख्या दैनंदिन संघर्षातून बाहेर पडून भविष्य आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित करावे, असे मोदी म्हणाले.
पूर्वी गरीब लोक घरासाठी सरकारच्या मागे धावत, मात्र, आता सरकार लोकांकडे जात आहे. पूर्वी घरे बांधली गेली. मात्र, त्यावेळी पारदर्शकतेचा अभाव होता. त्यामध्ये बरीच अनियमितता होती, त्यामुळे त्या घरांची गुणवत्ताही खूपच खराब होती. लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांच्या चक्करा माराव्या लागत, असे मोदी म्हणाले. दरम्यान, राज्यामध्ये आनंद असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजारो गरिब लोकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत, असे शिवराज सिंह म्हणाले.