नवी दिल्ली - 'मॅन वर्सेस वाइल्ड' या प्रसिद्ध मालिकेमध्ये बेयर ग्रिल्स सोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच झळकले. उत्तराखंड राज्यातील 'जीम कार्बेट नॅशनल पार्क' याठिकाणी या 'शो' चे चित्रिकरण करण्यात आले. हिंदीमध्ये प्रकाशित झालेल्या या 'शो'ची बरीच राजकीय व अ-राजकीय चर्चा देखील झाली. 'मॅन वर्सेस वाइल्ड' मालिकेचा सूत्रसंचालक बेयर ग्रिल्स याला हिंदी बोलता येत नाही व समजतही नाही. मग या भागामध्ये पंतप्रधानांनी त्याच्याशी कसा काय संवाद साधला असेल, याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतील. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रश्नाची उकल रविवारी झालेल्या 'मन की बात' मध्ये केली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, चित्रिकरणाच्या दरम्यान मी हिंदीमध्ये बोलत होतो. तर बेयर ग्रिल्स हा इंग्रजीमध्ये संवाद साधायचा. बेयरच्या कानाला एक छोटे उपकरण लावले गेले होते. मी जेव्हा हिंदीमध्ये बोलायचो तेव्हा ते वाक्य इंग्रजीमध्ये भाषांतर होत होते. त्यानंतर छोट्या उपकरणातून बेयर ग्रिल्सला ते ऐकू जायचे. त्यानंतर तो मला इंग्रजीमध्ये प्रश्न करित होता. अशा पद्धतीने हा संवाद पुढे चालत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट करत या तंत्रज्ञानाचे कौतुक केले.
'मॅन वर्सेस वाइल्ड' या भागाचे एडिटिंग केव्हा झाले, कसे झाले आणि किती वेळा झाले याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु यामध्ये गुपित असे काहीच नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बेयर आणि माझ्यात संवाद होत गेला. हा शो प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी जीम कार्बेट नॅशनल पार्कविषयी चर्चा केल्या असतील. आपण सर्वांनी याठिकाणी भेट दिली पाहिजे असल्याचा आग्रह मोदींनी 'मन की बात' मध्ये केला.