वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याआधी त्यांनी बुथ कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी सभा आयोजित केली आहे. या सभेला वाराणसीत सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी ते बुथ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी संवाद साधत आहेत.
मी सुद्धा बुथ कार्यकर्ता म्हणुन काम करत असताना पक्षाचे पोस्टर भींतींवर चिटकवल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीची प्रशंसा केली. मी फक्त निमित्त असून देशातील जनता निवडणुक लढत असल्याचे मोदी म्हणाले. पक्षाने वेळ मागितला तेव्हा वेळ दिला. तसेच तुम्ही माझे कार्यकर्ते नसून तुम्ही माझे मालक असल्याचे मोदी कार्यकर्त्यांना म्हणाले.
मोदींनी देशभरातील सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. नव मतदारांच कौतुक करा, त्यांना गोडधोड खायला घाला, असे ते यावेळी म्हणाले. देशात पहिल्यांदाच सत्ताधाऱयांच्या बाजूने लाट असल्याचे मोदी म्हणाले. पक्ष विजयी होईल तो देश विजयी होण्यासाठी असे म्हणत आपल्याला सगळे विक्रम तोडायचे आहेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. लोकशाही जिंकण्यामध्ये मला रस असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान पद ही एक तपस्या असून हे पद मौजमजेसाठी नसल्याचे मोदी म्हणाले.