नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (मंगळवार) अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी २० लाख कोटी आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर विरोधीपक्ष काँग्रेसने मोदींवर खोचक टीका केली आहे. मोदींनी फक्त जनतेला पॅकेजची हेडिंग दिली आणि बाकी सगळी पानं कोरीच ठेवली आहे, असे माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले. तळागळातील १३ कोटी जनतेच्या हातात या पॅकेजमधील किती पैसा जाईल, हे आम्ही पाहणार आहोत, असे ते म्हणाले.
पॅकेजमधून कोणाला काय मिळणार, काँग्रेस बारकाईने तपासणार?
'मोदींनी फक्त घोषणा केली आणि पान रिकामं ठेवलं, आता ते अर्थमंत्री निर्मला सितारामान यांना भरावे लागेल. मोदी सरकारद्वारे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देण्यात येणारा प्रत्येक रुपया काँग्रेस पक्ष मोजणार आहे. कोणाला काय मिळणार हे आम्ही बारकाईने तपासू. गरीब जनता, उद्ध्वस्थ झालेल्या स्थलांतरीत मजूरांना या पॅकेजमधून काय मिळते हे आम्ही प्रामुख्याने पाहणार आहोत.
मजूर हजारो किलोमीटरचा प्रवास करुन पायी घरी गेला, त्याला यातून काय मिळणार? तसेच अर्थव्यवस्थेच्या एकदम तळाला असलेल्या १३ कोटी जनेतेला या पॅकजेमधून किती पैसे मिळतात हे आम्ही पाहणार आहोत, असे चिदंबरम म्हणाले.
मोदींची आर्थिक पॅकेजची घोषणा
भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाच स्तंभांचा उल्लेख केला. इन्फ्रास्ट्रक्चर, मॉडर्न सिस्टीम, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि मागणी असा मंत्र त्यांनी सांगितला. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योगांसह अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताला स्वयंपूर्ण बनिवण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्रसिद्धी दिली पाहिजे. लोकल उत्पादनांचा प्रचार केला पाहिजे, असे मोदी म्हणाले.