बीजिंग - गलवान व्हॅली आणि सीमेवरील इतर भागातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यांने प्रभावी उपाय राबविण्याचे आज (गुरुवारी) चीनने म्हटले आहे. वाद असलेल्या भागातून दोन्ही देशांचे सैन्य माघारी घेण्यात येत असतानाच सीमेवरील परिस्थिती स्थिर असून सुधारत असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या आक्रमक धोरणामुळे मागील काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाला होता.
चीनने सीमा भागातील विवादीत तात्पुरते बांधकाम काढून घेतले असून पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग भागातूनही चिनी लष्कर मागे सरकले आहे, यास नवी दिल्लीतूनही दुजोरा मिळाला आहे. त्यानंतर आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते लाओ लिझिन यांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली.
कमांडर स्तरावरील चर्चेत सहमती झाल्यानंतर दोन्ही सैन्यांनी तणाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाय योजले, असे लिजिन यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक अधिकारी स्तरावर चर्चा सुरुच राहील. आम्हाला आशा आहे की, नवी दिल्ली तणाव कमी करण्यासाठी आणि बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या सोबत मिळून काम करेल, असे लिझिन म्हणाले.
सोमवारी सकाळी दोन्ही देशांनी सैन्य आणि लष्करी साहित्य विवादीत भागातून मागे घेण्यास सुरुवात केली. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांनी दोन तास सीमा वादावर चर्चा केली. त्यानंतर तणाव निवळण्यास सुरुवात झाली.