नवी दिल्ली - अमेरिकेत कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील विभा दत्ता मक्खीजा आणि कशीश अनेजा यांनी ही याचिका दाखल केली आहे.
अमेरिकेतील कोरोना रुग्णांची आणि बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये दररोज सुमारे १६०० ते २००० लोकांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील भारतीय नागरिक दहशतीखाली आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवण्यात यावे अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
यासाठी या याचिकेमध्ये संविधानातील 'कलम २१'चा (जगण्याचा, आणि वैयक्तीक स्वातंत्र्याचा अधिकार) दाखला देण्यात आला आहे.
दरम्यान, याआधीही याचप्रकारची याचिका इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, सरकार सध्या करत असलेले काम हे समाधानकारक असल्याचे म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली होती.
हेही वाचा : कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू, मुलांनी व्हिडिओ कॉलद्वारे घेतले वडिलांचे अंतिम दर्शन