पटना - आपले छान असे फोटोशूट करून ते सोशल मीडियावर शेअर करणे सर्वांनाच आवडते. मात्र, त्यावर लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतील हे सांगणे अवघड असते. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी'च्या (एनएफआयटी) एका विद्यार्थिनीला, आपल्या फोटोशूटसाठी सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. कारण, तिने बिहारमधील पुराच्या पाण्यात आपले फोटोशूट केले होते. आदिती सिंग, असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
सौरव आहुजा नावाच्या फोटोग्राफरने आदितीचे हे फोटो काढले आहेत. पटनाच्या नागेश्वर कॉलनी आणि एस. के पुरी भागामधील फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यांवर त्यांनी हे फोटोशूट केले होते.
बिहारमध्ये सध्या गंभीर पूरस्थिती आहे. महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुरामुळे आतापर्यंत २९ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता, पुराच्या पाण्यात फोटोशूट केल्यामुळे आदितीवर सध्या सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
हेही वाचा : बिहार महापूर: एनडीआरएफची १९ पथके कार्यरत, २९ जणांचा मृत्यू
फेसबुक पोस्टमधून दिले स्पष्टीकरण...
सौरव याने एका फेसबुक पोस्टमधून आपल्या कृत्याचे स्पष्टीकरण दिले आहे. बिहारमधील महापुराकडे देशभरातील लोकांचे लक्ष वेधले जावे यासाठी आपण हे फोटोशूट केल्याचे सौरवने सांगितले आहे. बाकी राज्यांमध्ये पूरस्थिती होती तेव्हा देशभरातील मीडियाचे लक्ष त्याकडे होते. मात्र, बिहारच्या पुराबद्दल त्याप्रमाणात बातम्या होताना किंवा लोकांना माहिती असल्याचे दिसत नाहीये. जर साधा पुराच्या पाण्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, तर लोक फारतर कमेंटमध्ये दुःख व्यक्त करून पुढे जातात. मला वाटत होते की लोकांनी थांबून ते फोटो पहावेत, जेणेकरून त्यांना इथली परिस्थिती कळेल. त्यामुळे मी असे फोटोशूट केले.
हेही वाचा : वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अफलातून कल्पना, हेल्मेट घालून खेळला गरबा