श्रीनगर - कलम ३७० हटवले गेल्यापासून काश्मीरमधील पत्रकार बिकट परिस्थितीला सामोरे जात आहेत. इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद असल्यामुळे त्यांना कामही करता येत नाहीये, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी देखील होते आहे.
कलम ३७० मधील 'सुधारणा' घोषित करण्याआधी एक दिवस, म्हणजेच ४ ऑगस्टपासूनच काश्मीरमध्ये विविध प्रकारचे निर्बंध लागू केले गेले होते. त्यानंतर बराच काळ सामान्यांना घरातून बाहेर पडणेही अशक्य झाले होते. आता तेथील निर्बंध हटवले गेले आहेत, आणि तिथे शांतता आहे असा दावा सरकार करत आहे. मात्र काश्मीरमध्ये खरोखर काय परिस्थिती आहे हे तिथल्या पत्रकारांनी सांगितले आहे.
जोहैब बट हे काश्मीरमधील एक पत्रकार आहेत. पत्रकाराचे काम हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणे असते, आणि शेवटपर्यंत मी ते करत राहील असे जोहैब म्हणतात. २०१६ मध्ये झालेल्या भारतीय लष्कर आणि काश्मीरमधील आंदोलकांमधील संघर्षादरम्यान जोहैब यांच्या डोळ्याला पॅलेट लागली. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जोहैब सध्या पत्रकरिता करतात, मात्र कॅमेरा वापरण्यास ते असमर्थ आहेत.
इब्राहिम मूसा हे एका स्थानिक वृत्तपत्रात काम करतात. ते सांगतात, की कलम ३७० हटवले गेल्यापासून पत्रकारांसाठी माहिती मिळणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूप अवघड झाले आहे. तसेच, प्रशासनाकडून पत्रकारांना त्रास दिला जाण्याच्या घटनांमध्येही गेल्या महिन्यापासून वाढ झाली आहे.
सन्ना इर्शाद मट्टो, या काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून फोटोजर्नालिस्ट म्हणून काम करत आहेत. त्या सांगतात की सध्या माध्यमांवर सरकार करडी नजर ठेऊन आहे. एखाद्या बातमीसंदर्भात लोकांशी बोलणे तर अशक्य आहेच, मात्र सरकारी अधिकाऱ्यांशी बोलणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणारी पत्रकारिता देखील, प्रशासनापुढे हतबल झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : काश्मीरमध्ये सारंकाही आलबेल नाही - यूसुफ तारिगामी