नवी दिल्ली - देशातील नागरिक कोरोना या महामारीशी लढत असतानाच त्यांना आता महागाईचाही सामना करावा लागत आहे. गेल्या 18 दिवसांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. आज (बुधवारी) नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 79.76 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 79.88 रुपये प्रति लीटर झाला आहे. आज पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचा दर वाढला असून डिझेलचा दर 48 पैशांनी वाढला आहे तर पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली नाही.
का वाढतायेत इंधनाचे दर?
लॉकडाऊनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. या दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या. हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेल दरांचा आढावा घेतला जातो व त्यानुसार दरवाढ केली जात आहे. यासोबतच इंधनाच्या दरात केंद्रीय आणि स्थानिक करांचा मोठा वाटा आहे. इंधनाच्या किमतीत जवळपास ७० टक्के कराचा समावेश आहे. ज्यात उत्पादन शुल्क, स्थानिक कर, व्हॅट अधिभार यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेल व्हॅटवरील अधिभार म्हणून प्रत्येकी २ रुपये वाढवले होते. अगोदरच टाळेबंदीने आर्थिक संकटात सापडलेल्या माल वाहतूकदार आता इंधन दरवाढीने बेजार झाले केले आहे.