नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारत देश दु:खात आहे.
सुषमा स्वराज या धडाडीचे आणि लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होत्या. मंत्री पदावर असाताना अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे कायमच महत्तवाच्या खात्याचा पदभार सोपवला जात असे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले काही महत्तवाचे निर्णय...
इंदिरा गांधीनंतर दुसरी महिला परराष्ट्र मंत्री -
सुषमा स्वराज या इंदिरा गांधीं यांच्यानंतरच्या दुसरी महिला परराष्ट्र मंत्रीपद सक्षमपणे सांभाळले आहे. भाजपच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दमदार विजय मिळवला होता. त्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांना महत्तवाचे असे परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सोपवला होता.
चित्रपटांना दिले होते उद्योगाचे स्थान -
13 दिवसांच्या वाजपेयी सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे सूचना आणि प्रसारण मंत्रालयासारखे महत्त्वाचे खाते सोपवले होते. त्यावेळी त्यांनी चित्रपटांना उद्योगांचा दर्जा देत एक ऐतिहासिक नर्णय घेतला होता. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांना सहजरित्या सरकारकडून अनुदान मिळत असे.
2019 ची लोकसभा निवडणूक न लढण्याच्या निर्णय -
सुषमा स्वराज यांनी तब्येतीच्या कारणास्तव 2019ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले. त्यानंतरही त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचे खात कायम होते. प्रकृतीमुळे त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नव्हती.
कर्नाटकाच्या बेल्लारीतून सोनिया गांधी विरुद्ध लढवली लोकसभेची निवडणूक -
1999 मध्ये कर्नाटकमधील बेल्लारीमधून सोनिया गांधी यांच्या विरुद्ध सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला जाण्यासाठी घेतला होता सुषमा स्वराज यांचा सल्ला -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काबुलवरुन दिल्लीला येत असताना ते लाहोरला जाणार होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी लाहोरला जाणार होते. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिला फोन सुषमा स्वराज यांनाच केला आणि जाण्यासंदर्भात सल्ला घेतला. याची माहितीही पंतप्रधानांनी एका भाषणात दिली आहे. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्यावर किती विश्वास आहे हे लक्षात येते.
पाकिस्तानातून गीताला आणले होते सुखरुप -
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या मदतीच्या घटना अनेकांना माहिती आहेत. कुणीही मदतीसाठी आवाज दिला की, सुषमा स्वराज त्याच्या सुटकेसाठी धावून जायच्या. मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकीने पाकिस्तानात गेलेल्या मूकबधीर गीता भटकरला सुखरूप मायदेशात आणले. तसेच तिची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, असेही त्यांनी गीताला सांगितले होते.