श्रीनगर - काश्मिरच्या नागरिकांनी कलम ३७० काढण्याच्या निर्णयावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून खोऱ्यात यानंतर दिर्घकाळ शांतता आहे. मात्र पाकिस्तान यामुळे नाखूश असून सतत खोट्या बातम्या पेरत असल्याचे वक्तव्य लष्करातील वरिष्ठ अधिकारी बीएस राजू यांनी केले आहे. कलम रद्दबातल ठरवल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. मोठ्या काळानंतर खोऱ्यात शांतता पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. अवंतीपुरा येथे पत्रकारांशी संवाद साधताना 'स्ट्रॅटेजिक कॉर्प्स- XV' चे प्रमुख बीएस राजू यांनी सांगितले.
दक्षिण काश्मीरचे कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल ए. सेनगुप्ता आणि सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक तसेच जनरल राजू काश्मिरच्या शोपियान प्रांतात ठार केलेल्या नऊ आतेरिक्यांबद्दल माहिती देत होते. या घटनेला २४ तास उलटल्यानंतर त्यांनी पत्रकारांना संबंधित माहिती दिली. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून खोऱ्यातील परिस्थिती पूर्ववत झाल्याचे त्यांनी सांगितले.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात नागरिक घराबाहेर पडत होते. शाळा सुरू होत्या. तसेच गुलमर्गमधील पर्यटन देखील सुरू होते. त्यावेळीपासूनच खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोना येण्याआधीच सर्व खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे आम्ही फक्त लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात गेलो, असे ते म्हणाले.
खोऱ्यातील शांततेवर पाकिस्तान नाराज
काश्मीरमध्ये अशांतता कायम ठेवणे हे पाकिस्तानचे ध्येय आहे. त्यामुळे खोऱ्यातील शांतता त्या देशाला बोचणारी आहे. यासाठी पाकिस्तान सतत खोऱ्यातील घडामोडींमध्ये सहभागी असतो. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या लष्कराला पाकिस्तानात महत्व प्राप्त होते. पाकिस्तान दोन प्रकारे काश्मिरात दहशतवादी कारवाया करते. यामध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार करणे आणि अवैधपणे माहिती पाठवणे या गोष्टी अंतर्भूत आहेत.