उदयपूर - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात चूल पेटणेही मुश्किल झाले आहे. सरकारने दिलेले रेशन उदयपूरमधील धार गावापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सरकारने शेतकरी आणि मनरेगामधील मजुरांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ग्रामस्थ बँकेत पैसा काढायला रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, तासन् तास वाट पाहून सुद्धा त्यांना पैसे मिळत नाही. धार गावामध्ये जास्तीत जास्त मजुरांची संख्या आहे. तसेच लहान-मोठे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामस्थांपर्यंत रेशन सुद्धा पोहोचलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत सरकार पुरवत असलेले अन्नधान्य पोहोचत आहे की नाही? याकडे सरकारने लक्ष ठेवावे, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.