इटानगर - अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे पेमा खांडू यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. २९ मे रोजी ते शपथ घेणार आहेत. भाजप नेते किरन रिजिजू यांनी ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली. नुकत्याच अरुणाचल विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपला ६० पैकी ४१ जागा मिळाल्या आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेची सदस्यसंख्या ६० एवढी आहे. या विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर ३८ जागांवर भाजपने विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसला ४, जनता दल (यु) ला ७, नॅशनल पीपल्स पार्टीला ५, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल यांना १ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
२०१४ मध्ये या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, प्रचंड राजकीय उलथापालथ होऊन पेमा खांडू यांच्यासह काँग्रेसच्या एक तृतियांश नेत्यांनी भाजची वाट धरली होती. भाजपच्या पाठिंब्याने पीपीए पक्षाने सत्ता स्थापन केली होती. पेमा खांडू यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. आता पुन्हा एकदा अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदी पेमा खांडू यांची नवड करण्यात आली आहे.