नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. यामध्ये निवडणूक आयोगानेही लक्ष घातले आहे, दरम्यान भाजप खासदार परवेश वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यावर केजरीवाल यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले आहे.
'पाच वर्ष रात्रंदिवस दिल्लीसाठी कष्ट केले. दिल्लीसाठी सर्वकाही त्याग केला. राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक अडचणींचा सामना केला. लोकांचे जीवन चांगले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच्या बदल्यात भारतीय जनता पक्ष मला दहशतवादी म्हणत आहे, याचे खुप दु:ख होत आहे, असे ट्विट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.भाजप खासदार परवेश वर्मा यांनी एका प्रचार सभेला संबोधित करताना केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्यासारखे दहशतवादी लपून बसले आहेत, असे शर्मा म्हणाले होते.