श्रीनगर : यावेळी होत असलेली जम्मू-काश्मीर डीडीसी निवडणूक ही बऱ्याच गोष्टींमुळे विशेष ठरत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणारी होणारी ही पहिली निवडणूक आहे. तसेच, पहिल्यांदाच प्रांतातील बरेच स्थानिक पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. मात्र, आणखी एक गोष्ट या निवडणुकीला विशेष बनवत आहे; ती म्हणजे यामधील उमेदवार. कुपवाडा जिल्ह्याच्या द्रागमुल्ला भागामधून चक्क एक पाकिस्तानी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
काश्मीरी युवकाशी झालंय लग्न..
जम्मू-काश्मीर प्रशासनाने यावेळी पहिल्यांदाच पूर्व-पाकिस्तानमधील शरणार्थींना निवडणुकीसाठी उभे राहण्याची मुभा दिली आहे. यामुळेच, सोमिया सदफ या पाकिस्तानी महिलेला निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आहे. दहा वर्षांपूर्वी सदफ यांचे एका काश्मीरी तरुणाशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्या काश्मीरच्याच रहिवासी आहेत. अब्दुल मजिद हा तरुण लाहोर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या दोघांची ओळख झाली होती. आता या दाम्पत्याला तीन मुलं आहेत.
लोकांच्या प्रेमापोटी निर्णय..
२०१५मध्ये सरकारच्या उम्मीद या योजनेतून त्यांनी यशस्वीपणे व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या 'प्रोग्रेसिव्ह वुमेन आंत्रप्रन्योरशिप' या कार्यक्रमात त्यांनी जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्वही केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला होता. सदफ यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण हे मौलाना आझाद विद्यापीठातून पूर्ण केले आहे. स्थानिक लोकांच्या प्रेमापोटीच आपण निवडणुकीला उभे राहण्याचे ठरवले, असे त्या सांगतात.
आज निकाल..
जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होईल. गुपकर आघाडी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असणार आहे. या निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रत्येकी १४० जागांवर या निवडणुका झाल्या. २८ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या निवडणुकांमध्ये सरासरी ५१ टक्के मतदानाची नोंद झाली.
हेही वाचा : जम्मू काश्मीर डीडीसी निवडणुकांचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात, पाहा LIVE अपडेट्स..