श्रीनगर - लेहमधील एक महिला श्योक नदीत बुडाल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. या महिलेचे मृतदेह नदीतून वाहत पाकिस्तानातील बाल्टिस्तान प्रांतात गेले होते. आज(शनिवार) सायंकाळी या महिलेचा मृतदेह पाकिस्तानी रेंजर्स भारतीय लष्कराकडे सोपविणार आहेत. काल(शुक्रवार) पाकिस्तानी लष्कराने याबाबत माहिती दिली होती.
कुपवाडा जिल्ह्यातील करन्हा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर मृतदेह भारतीयांच्या हाती सोपविणार आहे. खैर उन-निसा असे मृत महिलेचे नाव असून ती लेहमधील रहिवासी होती. नदीत पडल्यानंतर ती २६ ऑगस्टला बेपत्ता झाली होती. पाकिस्तानधील बाल्टिस्तान प्रांतातील स्थानिक नागरिकांनी महिलेचा मृतदेह नदीबाहेर काढला होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तान पोलिसांनी महिलेचे छायाचित्र आम्हाला पाठविले होते. ओळख पटल्यानंतर मृतदेह हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दोन्ही देशातील तणाव वाढलेला असता मृतदेह माघारी आणणं कठीण होते. मात्र, दोन्ही देशांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे मृतदेह माघारी आणण्यास मदत झाली, असे काश्मीरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.