श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - चीनसोबत भारताचा वाद सुरू असतानाच पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने पुन्हा पुंछ आणि कठुआ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आज(रविवारी) सकाळी पाकिस्तानकडून अचानक गोळीबार झाला तसेच मोर्टारही दागण्यात आले. भारतीय सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काल घडलेल्या अशाच एका घटनेत उरी सेक्टरमध्ये 3 नागरिक जखमी झाले.
पहाटे सव्वा सहाच्या सुमारास पाकिस्तानने बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या बाजूला लहान शस्त्रे आणि मोर्टारही दागले. भारतीय सैन्य योग्य प्रकारे प्रत्युत्तर देत आहे, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. दोन्ही बाजूंनी गोळीबार केल्यामुळे सीमावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, शनिवारी कठुआ येथे पाकिस्तानचे एक ड्रोन हाणून पाडण्यात आले आहे. बीएसएफने शूट केलेल्या ड्रोनमध्ये शस्त्र देखील लावले होते. हे ड्रोन भारतीय सीमेच्या 250 मीटर आतमध्ये येऊन हेरगिरी करत होते.
यावर्षी जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात मोठी वाढ झाली असून 10 जूनपर्यंत 2 हजार 27 पेक्षा जास्त शस्त्रसंधीचे उल्लंघन नोंदविण्यात आले आहे. या महिन्यात राजौरी आणि पुंछ या भागात पाकिस्तानी गोळीबारात लष्कराचे तीन जवान शहीद झाले.