वॉशिंग्टन - पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणींमध्ये पुरता अडकला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे कर्जासाठी डोळे लावून बसला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गाजावाजा करत अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र, चीन बरोबर गट्टी जमली असताना अमेरिकेला भेट देणे म्हणजे, चीन बरोबर लग्नं आणि अमेरिकेसोबत लफडं, असल्याचे मत पाकिस्तातून हद्दपार केलेले पत्रकार तहा सिद्दिकी यांनी म्हटले आहे.
चीनसोबत बनवत असलेल्या 'सीपीईसी' म्हणजेच चायना पाकिस्तान ईकॉनॉमिक कॉरिडार' या प्रकल्पाची गती मंदावली आहे. यातून जास्त काही पदरात पडत नसल्याचे पाहून पाकिस्तानने आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला आहे. या भेटीतून पंतप्रधान इम्रान खान आर्थिक आणि लष्करी मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आशिया खंडामध्ये भू-राजकीयदृष्या महत्त्वाच्या असलेल्या स्थानाचा पुरेपूर फायदा उठवत असल्याचे, तहा सिद्दिकी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीला खान यांच्यासोबत लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हेही असणार आहेत. तसे पाहता बाजवा हेच पाकिस्तानचे सर्वेसर्वा आहेत. जनरल बाजवा यांना अमेरिकेसोबत पुन्हा एकदा संबध प्रस्थापित करण्याची गरज वाटत आहे. भविष्यात इराण आणि अफगाणिस्तानबाबत काही वादंग उठले तर अमेरिकेला पाकिस्तानची मदत नक्कीच लागेल, हे ते ओळखून आहेत, त्याचा फायदा पाकिस्तान नक्कीच घेईल, असे सिद्दीकी म्हणाले.
अमेरिकेलाही चिनी ड्रगला रोखण्यासाठी पाकिस्तानची मदत हवी आहे. त्यामुळे पाकिस्तान हा डबल गेम खेळत आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त आर्थिक मदत पदरात पाडून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. चीन रचत असलेल्या व्यूहात्मक खेळीलाही पाकिस्तान मदत करत आहे, त्यामुळे चीनकडूनही त्यांना मदत मिळत आहे. या दोन महासत्तामध्ये सुवर्णमध्ये ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचे सिद्दिकी म्हणाले.