जयपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. याचा फटका राजस्थानमधील अनेक स्थलांतरित लोकांनाही बसला आहे. जोधपूरमध्ये राहत असलेल्या ४ हजार पाकिस्तानी स्थलांतरित नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, शासनाने त्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित यांनी याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.
जोधपूरच्या आसपास राहणाऱया सर्व लोकांना जेवण आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये पाक स्थलांतरितांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांनाही इतरांप्रमाणे जेवण आणि रेशन उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
जोधपूरच्या आसपास चार वेगळ्या ठिकाणी ४ हजारपेक्षाही जास्त पाक स्थलांतरित राहतात. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानी हिंदू नागरिकांचा समावेश आहे. यातील अनेकांना अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. लॉकडाऊनच्या मागील १५ दिवसांत एकदाही सरकारी यंत्रणांकडून या लोकांची दखल घेतली गेली नाही. सामाजिक संस्थांच्या मदतीवर या स्थलांतरितांची गुजरान सुरू आहे.
ईटिव्ही भारतने याबाबत बातमी प्रसारित करुन प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत या स्थलांतरितांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. चोखा, गंगाना, सूरसागर आणि गोकूळची विहिर या परिसरातील लोकांना मदत मिळणार आहे.