हैदराबाद - देशभरातील वाढता कोरोनाचा आकडा चिंताजनक असला, तरीही मृत्यूदर कमी असल्याने कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळत आहे. कोविड वॉरियर्स आणि राज्य सरकारे या लढाईत विविध स्तरांवर सामना करीत आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...
महाराष्ट्र
राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून गेल्या चोवीस तासांत नव्या ३६०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ३५९० मृत्यू झाले असून मागील चोवीस तासांत १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या ९७,६४८ वर गेली आहे. यातील एकूण ४७ हजार ९८० केसेस अॅक्टिव्ह आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत २ हजार ९८५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दहा वर्षांखालील एकाही बालकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले नाही.
नवी दिल्ली
गुरुवारी राजधानीत १ हजार ५०१ नव्या केसेस सापडल्या आहेत. यामुळे दिल्लीतील एकूण कन्टेन्मेंन्ट झोन्सची संख्या २४२वर गेली आहे. राजधानीच्या उत्तरेला सर्वाधिक ३५ झोन्स आहेत. दक्षिण-पश्चिम ३२, पश्चिम ३१, उत्तर पश्चिम २२, पूर्व १९ झोन्स आहेत.
राजस्थान
आतापर्यंत भरतपूर जिल्ह्यात १२२ सुपर कोरोना स्प्रेडर्स सापडल्याचे समोर आले आहे. मागील १७ दिवसांत भरतपूरमध्ये ६२३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सुपर स्प्रेडर्स हे कोरोना कॅरियर्स असून ते वेगाने महामारीचा प्रसार करत आहेत. या व्यक्तींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव वाढण्याचा धोका उद्भवला आहे. सध्या आरोग्य विभाग या सुपर स्प्रेडर्सचा शोध घेत आहे.
कर्नाटक
कर्नाटक सरकारने ऑनलाइन क्लासेस बंद केले आहेत. यामध्ये पाचवीपर्यंतच्या इयत्तांचा समावेश आहे. शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत संबंधित निर्णयांची घोषणा केलीय. तसेच येणाऱ्या काळात सातवीपर्यंतच्या इयत्तेचे क्लासेस बंद करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारकडे हा विषय विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश
गुरुवारी राज्यात ४८० नव्या कोरोगाबाधितांची भर पडली असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी आग्रा हा राज्यातील हॉटस्पॉट होता. मात्र आता कानपूर, जौनपूर आणि पूर्वांचलमध्ये संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांत कानपूरमध्ये ४९ पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. तर जौनपूरमध्ये बुधवारी ५२ नव्या केसेस आढळल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने १५ हजार नागरिकांच्या टेस्ट एकाच दिवसात करण्याचे लक्ष गाठले आहे.
उत्तराखंड
राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये त्यांच्या दोन मुलांना आणि दोन मुलींना देखील बाधा झाली आहे. तसेच नातवाचा समावेश आहे. ३० मे रोजी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांना ११ जूनला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हरियाणा
गुरुवारी राज्यात एकूण १२ मृत्यू झाले असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. एकूण बाधितांची संख्या सहा हजारांच्या जवळपास गेली आहे. सर्वाधिक मृत्यू गुरुग्राममध्ये नोंदवण्यात आले आहेत. फरीदाबादला ४ तर अंबाला आणि रोहतकमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.