कोटा - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांनी आपल्या घराची वाट धरली. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातून तब्बल 2 हजार स्थलांतरीत कामगारांना त्याच्या राज्यात सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तसेच देशातील विविध भागातून बुंदी जिल्ह्यामध्ये 1 हजार 200 कामगार परत आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशमधील 145 स्थलांतरीत कामगारांना बसेसने त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान बिहारमधील 470 आणि पश्चिम बंगालमधील 132 कामगार जिल्ह्यात अडकले आहेत. दोन्ही राज्य सरकारशी चर्चा सुरू असून त्यांनाही सोडण्यात येणार आहे.
राज्य सरकार रेल्वे आणि बसेसने स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात सोडत आहेत. तर काही कामगार पायीच आपल्या घराच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले.