बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज यावर्षीच्या बंगळुरू तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन केले. ते व्हर्चुअली या कार्यक्रमाला उपस्थित होते. "डिजिटल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ तयार करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. आमच्या सरकारचे गव्हर्नन्स मॉडेलच 'टेक्नॉलॉजी फर्स्ट' हे आहे", असे मोदी यावेळी म्हणाले.
कर्नाटक सरकारची इनोव्हेशन टेक्नॉलॉजी सोसायटी आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद असणार आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञान..
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांची मदत करणे अधिक सुलभ झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ एका क्लिकवर लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदतीची रक्कम जमा करता येणे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले. लोकांसाठी तयार केलेल्या आमच्या योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे कामही तंत्रज्ञानामुळेच सुलभ झाल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही करणार संबोधित..
हे या परिषदेचे २३वे वर्ष आहे. या परिषदेमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि स्वित्झरलँडचे उपराष्ट्रपती गाय परमेलिनही संबोधित करणार आहेत. यावर्षी या परिषदेत एकूण २५ देश सहभागी होणार आहेत.
२००हून अधिक भारतीय कंपन्या..
या परिषदेमध्ये २००हून अधिक भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच, ४ हजारांहून अधिक प्रतिनिधी आणि २७० वक्ते सहभागी होणार आहेत. या परिषदेत ७५ चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये दररोज ५० हजारांहून अधिक लोक उपस्थिती दर्शवतील.
हेही वाचा : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आज जयंती; राहुल गांधींनी वाहिली आदरांजली