नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदी केल्याच्या निर्णयावरुन विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली. या भेटीमध्ये आयोगाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचार बंदी करण्यात आली आहे. मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलामध्ये हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी हा निर्णय घेतला.
बंगालमध्ये शुक्रवारी रात्रीपासून प्रचारबंदी होणार होती. मात्र निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या नऊ जागांसाठी १९ मे रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित राबवली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने सांगितले होते.
विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रचारबंदीबाबत निवडणूक आयोगाची भेट घेतली. मात्र, या भेटीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सिंघवी यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसेला भारतीय जनता पक्ष जबाबदार असताना यासाठी दूसऱ्या पक्षांना त्रास देण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला असल्याचे सिंघवी म्हणाले.