भोपाळ - मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवले. मात्र, आमदार फोडून भाजपची सत्ता उलथवण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला नाही. हरियाणात नेण्यात आलेल्या आठ आमदारांपैकी चार आमदार भोपाळमध्ये परतले आहेत. काँग्रेसचे मंत्री तरुण भनोट विशेष विमानाने या आमदारांना घेवून भोपाळमध्ये पोहोचले आहेत.
बहुजन समाज पक्षाचे आमदार संजीव सिंह कुशवाह, रणवीर जाटव, पथरिया मतदार संघाच्या आमदार राम बाई आणि काँगेस आमदार एंदल सिंह कंसाना भोपाळमध्ये माघारी आले आहेत.
काँग्रेस सरकारमधील मंत्री जीतू पटवारी आणि तरूण भनोट या चार आमदारांना घेवून मुख्यंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजने केलेल्या या घोडेबाजारावर मुख्यमंत्री कमलनाथ पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकार स्थिर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मध्यप्रदेशातील सत्तेसाठी भाजप हपापली असल्याचे माजी खासदार अरूण यादव यांनी म्हटले आहे. तर कर्नाटकसारखी स्थिती राज्यात होणार नसल्याचे विधानसभा उपाध्यक्षा हिना कावरे म्हणाल्या आहेत.
काल (मंगळवार) मध्यप्रदेशच्या सत्तेचा 'हाय व्होलटेज ड्रामा' हरियाणातील गुरुग्रामधील एका हॉटेलात पाहायला मिळाला. काँग्रेला पाठिंबा देणारे आठ आमदार भाजपच्या काही नेत्यानी ओलीस ठेवल्याचे समोर आले होते. त्यानंर राज्यातील हालचालींना वेग आला होता. मध्यप्रदेशचे मंत्री जयवर्धन सिंह व जीतू पटवारी यांनी गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलकडे रवाना झाले. त्यानंतर आमदारांना बाहेर काढण्यात आले. भाजपने रग्गड पैशाची ऑफर पाठिंबा देणाऱ्या आमदारांना दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.