नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे शहरातील लाखो मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. पायी चालत किंवा मिळेल त्या वाहनाने मजूर गावी निघाले आहेत. या मजूरांना तत्काळ राशन म्हणजेच शिधा मिळावा म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालायने देशात कोणत्याही कोपऱ्यात असाल तरीही राशनकार्डवर अन्नधान्य मिळेल अशी घोषणा केली आहे. तसेच पुढील २ महिने मोफत धान्य मिळणार अशी घोषणा केली.
तत्काळ एक देश एक राशन योजनेची अंमलबजावणी होणार नाही?
देशात कोठेही एकाच राशन कार्डद्वारे धान्य मिळणार असले तरी ही योजना कार्यान्वित होण्यासाठी ऑगस्ट उजाडणार आहे. तोपर्यंत ८३ टक्के नागरिक या योजनेच्या कक्षेत येतील, असे अर्थमंत्रालायने म्हटले आहे. उर्वरित नागरिकांचा यात समावेश होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.
तत्काळ धान्य मिळण्याची शक्यता नाही
आधार कार्डद्वारे देशभरात ही योजना राबविणे शक्य असले तरी सध्या विविध राज्यात परतलेल्या मजूरांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. यासाठीची व्यवस्था उभी करण्यास नक्कीच काही कालावधी जाणार आहे. त्यानंतरच ही योजना कार्यान्वित होईल. सध्यापुरती ती फक्त एक घोषणाच राहण्याची शक्यता आहे.