तिरुवअनंतपूरम - केरळमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका 73 वर्षीय महिलेची चाचणी कोरोना आज (गुरुवार) पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती पल्लकड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 25 मेला महिला चेन्नईवरून राज्यात परतली होती.
घरी क्वारंटाईन असताना ताप आल्याने रुग्णालयात दाखल केले असता महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला होता. या महिलेला इतरही आरोग्याच्या समस्या होत्या. असे पल्लकडच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. सुरवातीला महिलेची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, दुसऱ्यांचा स्वॅब तपासणी केला असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.
महिलेचे नातेवाईक आणि ती ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेली होती, त्या सर्वांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. पलक्कड जिल्ह्यातील ही पहिलाच कोरोनाचा मृत्यू आहे. जिल्ह्यात 148 कोरोनाचे रुग्ण असून राज्यात सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे.
केरळमध्ये आत्तापर्यंत 1 हजार 494 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यातील 651 बरे झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वात पहिला कोरोनाग्रस्त केरळ राज्यात आढळून आला. मात्र, इतर राज्यातील कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात केरळला यश आले. आता इतर राज्यातून माघारी येणाऱ्या प्रवाशांमुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू राज्यांची तुलना करता केळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.