लखनौ - पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका संशयिताला आंध्रप्रदेश पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. आंध्रप्रदेश पोलिसांचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी उत्तरप्रदेशातील कौशींबी येथे आले होते.
हेही वाचा - आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!
इंतजार सय्यद असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे राहत असताना या संशयिताने लष्कराशी संबधीत कागदपत्रे पाकिस्तानला दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कौशींबी जिल्ह्यातील करारी पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली. करारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्ण प्रताप सिंह यांनी आणि आंध्रप्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
हेही वाचा - #CAA : जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट हॅक
देशद्रोहाचा गुन्हा दाखल
संशयित आरोपी विरोधात यावर्षी जानेवारी महिन्यात आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयिताचे पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयशी संबध असल्याचे समोर आले आहे. भारतातील गुप्त माहिती आणि कागदपत्रे पाकिस्तानला दिल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात नेण्यात आले होते. तेथून आंध्रप्रदेश पोलीस आरोपीला घेऊन गेले.