नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्येतील भाषणावर टीका केली आहे. देशाची लोकसंख्या 138 कोटी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भाषणातून 8 कोटी लोकांना वगळले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेवर चर्चा असताना ही बाब चिंताजनक असल्याचे थरुर यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी 8 कोटी जनतेला भाषणातून वगळणे हे जाणीवपूर्वक नसेल तर सुधारणा ही आश्वासक ठरेल, असे काँग्रेसचे शशी थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर ट्विट करून टीका केली. त्यांनी ट्विमध्ये म्हटले, की राम मंदिराच्या स्थळावर पंतप्रधान मोदी यांनी 130 कोटी नागरिकांचे अभिनंदन केले. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार 2020 च्या मध्यावधीत भारताची लोकसंख्या 138 कोटी 4 हजार 385 आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या (एनआरसी) विषयानंतर 8 कोटी लोकांना वगळणे चिंताजनक आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की अनेक पिढ्यांनी अनेक शतके राममंदिराच्या बांधकामासाठी निस्वार्थपणे त्याग केला आहे. मी देशातील 130 कोटी नागरिकांच्या वतीने त्यांना वंदन करतो. त्यांच्या त्यागासाठी नतमस्तक होतो. त्यांच्यामुळे राममंदिराची पायाभरणी होत आहे.