चमराजनगर - बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने (डीडब्ल्यूसीडी) कंबर कसली आहे. सोमवारी या विभागाने चमराजनगर जिल्ह्यात होणारे तब्बल सात बालविवाह रोखले आहेत. आज सकाळी 5 वाजता इंडिगनाट्टा गावात 15 वर्षाच्या मुलीचा विवाह नियोजित केल्याची माहिती विभागाला मिळाली होती. यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हा विवाह रोखला.
इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनी मुलीच्या पालकांना कायद्याबद्दल समजावून सांगितले. सोबतच भारतात बालविवाह बेकायदेशीर असल्याचेही स्पष्ट केले. सोबतच अरकलावाडी आणि वायके मोल गावात 16 वर्षांची मुलगी आणि 14 वर्षाच्या मुलीचा विवाहही अधिकाऱ्यांनी रोखला. याशिवाय अधिकाऱ्यांनी अमचवडी आणि शेट्टीहल्लीमध्येही बालविवाह रोखले
विभागाने या महिन्यात तब्बल 20 बालविवाह रोखले आहेत. तर मे महिन्यातही अशाचप्रकारचे 18 विवाह रोखले आहेत. तर मे महिन्यात तीन बालविवाह झाल्याचे लक्षात येताच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज रोखण्यात आलेल्या विवाहांमधील पालकांवर गुन्हे दाखल केले गेले नाही. याऐवजी त्यांना कायद्याचे शिक्षण देण्याचा पर्याय अधिकाऱ्यांनी निवडला.
युनिसेफच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी 18 वर्षांखालील 1. 5 मिलीयन मुलींचा विवाह केला जातो. जगाभरात सर्वाधिक बालविवाहाचे प्रमाण भारतात आहे. गेल्या काही वर्षांत बालविवाहाची संख्या कमी होत असली तरी, भारतात हे प्रमाण अजूनही खूपच जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे.