नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'एन्व्हारन्मेटल इम्पॅक्ट असेसमेंट 2020' या आराखड्यावर प्रश्न उपस्थित करणे, हे अनावश्यक आणि अपरिपक्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका पत्रकार परिषदेमध्ये जावडेकर म्हणाले, की या आराखड्यावर प्रश्न उपस्थित करणारे तेच लोक आहेत, ज्यांंनी स्वतः सत्तेत असताना मोठमोठे निर्णय कोणताही विचार न करता घेतले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एन्व्हारन्मेटल इम्पॅक्ट असेसमेंट 2020' आराखडा म्हणजे देशाची लूट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या 'सूट-बूट' मधील मित्रांना देशातील संसाधने लुटण्यासाठी मदत करत आहेत. भाजप सरकार श्रीमंतांसाठी काय करत आहे, याचे आणखी एक भयंकर उदाहरण आहे, असे गांधींनी ट्वीट केले आहे. ईआयए २०२० चा मसुदा मागे घ्यावा लागेल, अशी मागणी त्यांनी केलीय. तसेच, याविरोधात निषेध करण्याचे आवाहन करून या आराखड्याचे दीर्घकालीन परिणाम आपत्तीजनक असल्याचे गांधींनी सांगितले आहे. आता काँग्रेसतर्फे याविरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवण्यात येणार आहे.
याबाबत विचारले असता जावडेकर म्हणाले, की हा अंतिम निर्णय नाही, त्यामुळे याविरोधात कोणी आंदोलन कसे करु शकते? हा केवळ आराखडा आहे, आणि यावर लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. सामान्य परिस्थितीमध्ये ६० दिवसांमध्ये या सूचना मागवाव्या लागतात, मात्र कोरोना परिस्थिती पाहता आम्ही १५० दिवस हा आराखडा पब्लिक डोमेनवर ठेवला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर आता आम्हाला हजारो प्रतिक्रिया, सुधारणा आणि सूचना मिळाल्या आहेत. त्यांवर चर्चा करुन आम्ही अंतिम आराखडा सादर करू. त्यामुळे आत्ताच यावर टीका करणे योग्य नाही, असेही जावडेकर म्हणाले.