मुंबई - कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता जगभरात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. एकट्या महाराष्ट्रात 87 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 2 लाख 11 हजार 987 जणांना आत्तापर्यंत लागण झाली आहे. चिंता वाढविणारी बाब म्हणजे एकट्या मुंबईने रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या दरात चीनला मागे टाकले आहे.
मुंबई शहरात 4 हजार 938 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 85 हजार 724 बाधित आढळून आले आहेत. संपूर्ण चीनमध्ये 83 हजार 565 कोरोनाचे रुग्ण होते तर 4 हजार 634 जग दगावले होते. मुंबई शहर कोरोना संसर्गात जगात 22 व्या क्रमांकावर आहे.
चीनमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा वेग कमी झाला आहे. धारावीत सापडणाऱ्या रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण चीनमध्ये एका दिवसात सापडत आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी गंभीर कोरोना संकटात सापडली होती. मात्र, आता तेथील कोरोनाचा प्रसार मंदावला आहे. चीनच्या तुलनेत मुंबई शहरात १ जुलैपासून दररोज १ हजार १०० पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद होत आहे.
एकट्या महाराष्ट्र राज्याने तुर्कस्थान या देशाला कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागे टाकले आहे. तुर्कस्थानात सुमारे 2 लाख 5 हजार रुग्ण आहेत. 4 जुलैला जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आता जागतिक रुग्ण संख्येत जर्मनी 16 व्या आणि दक्षिण आफ्रिका 15 व्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 9 हजार 26 जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 11 हजार 987 आहे. यामध्ये 87 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 54.37 टक्के आहे.