पाटणा - लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यावर कोणाचाही विश्वास नाही आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) त्यांच्या पक्षासोबत जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. तसेच एनडीएचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील. आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, असेही ते म्हणाले.
ठाकूर यांनी महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, लालूप्रसाद यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. ते तुकडे तुकडे गँगच्या बाजूने आहेत. यामुळे जनता राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यावर कसा विश्वास ठेवेल? तेजस्वी हे नरसंहार करणाऱ्या लोकांसोबतच तुकडे तुकडे टोळीशी संबंधित आहेत. तसेच जातीच्या आधारावर फूट पाडणारे राजकारण करतात, अशी टीकाही ठाकूर यांनी केली. बिहारमधील जनतेला माहित आहे, राज्यात जंगलराज परत येऊ शकतो.
दरम्यान, कर्नाटकातील भाजपाचे नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी चिराग पासवान उत्साही नेता तसेच विशेष मित्र असल्याचे संबोधले आहे. ते म्हणाले, चिराग पासवान खूप उत्साही नेते आहेत. संसदेत, त्यांनी बिहारचे प्रश्न माहितीपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. ते प्रसिद्ध युवा नेते आणि एक खास मित्र आहेत, असे म्हणत सूर्या यांनी चिराग यांना शुभेच्छाही दिल्या.