लखनऊ - उत्तर प्रदेश राज्यात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चाचण्या कमी होत असल्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच 'नो टेस्ट, नो कोरोना' ही पॉलिसी भीतीदायक असल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी राज्यात अडीच हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सर्वच मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होत आहे. भाजप सरकारने 'नो टेस्ट नो कोरोना' ही पॉलिसी स्वीकारली आहे. आता राज्यात कोरोना केसेसचा विस्फोट होत आहे. पारदर्शीपणे कोरोना चाचण्या सुरु केल्याशिवाय कोरोना विरोधातील लढाई अपूर्ण ठरेल. परिस्थिती आणखी खराब होऊ शकते, असा इशारा प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राज्यातील क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयांची स्थिती बिकट आहे. काही रुग्णालयातील स्थिती तर इतकी बिकट आहे, नागरिक रुग्णालयात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे चाचण्याही कमी होत आहेत. राज्यात भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला असून वेळीच यावर उपाय केले नाही, तर कोरोना राज्यासाठी एक आपत्ती बनेल, असे त्यांनी पत्रात लिहले आहे. राज्यात दीड लाख खाटा उपलब्ध असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, 20 हजार रुग्ण असतानाच खाटांची कमतरता भासायला लागली आहे. मुंबई आणि दिल्लीच्या धरतीवर तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य सुविधा हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क असल्याची आठवण गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना करून दिली.
पंतप्रधान मोदी वाराणसी आणि संरक्षण मंत्री राजनाधसिंह लखनऊ मतदार संघातून खासदारपदी निवडून गेले आहेत. तसेच अनेक केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशातून निवडून गेले आहेत. वाराणसी, आग्रा आणि लखनऊमध्ये तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये का उभारण्यात येत नाहीत? परिस्थिती गंभीर होत आहे. मी तुम्हाला विनंती करते की, कोरोना विरोधातील युद्ध एकट्याने लढता येणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.