हैदराबाद - गरीब मुस्लीम कुटुंबांना यंदा रमजान दिवशी मिळणाऱ्या भेटवस्तू मिळणार नाहीत. तेलंगणा सरकार दरवर्षी राज्यातील मुस्लीम बांधवांना ईदच्या काळात भेटवस्तू देत असते. मात्र, 2015पासून सुरू असलेला हा कार्यक्रम यंदा रद्द करावा लागला आहे.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत रमजानच्या भेटवस्तूंचे वाटप केल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होऊ शकते. याच कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले.
ईद इफ्तार दरम्यान राज्यभरातील मस्जिदींमध्ये ठेवण्यात येणाऱ्या भोजनासाठी आणि गरिबांना कपडे वाटण्यासाठी सरकारने 2022-21च्या बजेटमध्ये 66 कोटी रुपये जाहीर केले होते. तर, दरवर्षी मुख्यमंत्री हैदराबादमध्ये आयोजित करत असलेल्या इफ्तार पार्टीसाठी 1.83 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्र्यांकडून आयोजित केलेली पार्टी आणि इतर सर्वच गोष्टी रद्द झाल्या. यामुळे हा संपूर्ण निधी अन्नधान्य किटच्या वितरणासाठी वापरण्याचा प्रस्ताव होता. यातून चार लाखांहून अधिक गरीब कुटुंबांना मदत होण्याची अपेक्षा होती. अल्पसंख्याक कल्याण विभागाने यासंबंधी प्रस्तावही सादर केला. यामध्ये रमजानला भेट म्हणून कपडे देण्याऐवजी सरकारने खाद्यान्न पाकिटे वाटप करावी, यामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांची आवश्यक काळजी घेता येईल, असे म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही.
लॉकडाऊनदरम्यान मदत म्हणून सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत तांदूळ आणि दीड हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे, गरीब मुस्लीम कुटुंबांसाठी वेगळा कार्यक्रम ठेवण्याची गरज नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.