नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यांमध्ये भारत-चीन सीमेवर घुसखोरीची एकही घटना झाली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेमध्ये दिली. बुधवारी राज्यसभेचे कामकाज सुरू असताना, खासदार डॉ. अनिल अग्रवाल यांनी पाकिस्तान आणि चीन सीमेवरून झालेल्या घुसखोरी संबंधात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंदर राय यांनी ही माहिती दिली.
फेब्रुवारीनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरून घुसखोरीच्या ४७ घटना घडल्या असल्याचेही राय यांनी सांगितले. सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर विविध स्तरांवर उपाययोजना राबवत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचीही मदत होत असल्याची माहिती राय यांनी दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यसभेमध्ये बोलताना, चीन आणि भारतीय सैन्यादरम्यान झालेल्या झटापटीची माहिती दिली होती. १५ जूनला गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या या झटापटीत देशाच्या २० जवानांना वीरमरण पत्करावे लागले होते. यासोबतच, चीनने भारताची कित्येक हेक्टर जमीनही बळकावल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली होती.
राजनाथ सिंह यांची माहिती आणि राय यांनी दिलेली माहिती ही एकमेकांविरुद्ध नसल्याचे स्पष्टीकरण गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिले आहे. सैन्याने बळकावलेली जागा, आणि दहशतवाद्यांची घुसखोरी यामध्ये फरक आहे. भारत-चीन सीमेवरून गेल्या सहा महिन्यांत 'घुसखोरी'ची एकही घटना झाली नसल्याचे राय यांनी सांगितले आहे, जे की योग्यच आहे असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा : 'कोरोना काळातील मोदींची आश्वासने म्हणजे खयाली पुलाव'