कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचार बंदी करण्यात आली आहे. मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलामध्ये हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. भारतात बहुदा पहिल्यांदाच ३२४ या कलमाचा वापर करण्यात आला आहे.
![election, campaigning, parliamentary, constituencies, West, Bengal, बंगाल, प्रचारबंदी, ३२४,](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3291937_ecbengalnew.jpg)
गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या नऊ जागांसाठी १९ मे रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित राबवली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपने कोलकातामध्ये झालेल्या गोंधळाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावरुन निवडणूक आयोगाने कडक पाऊल उचलले आहे. पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडे गृह सचिवांच्या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर वीडियो अपलोड करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
अमित शाह यांच्या रॅलीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे पोस्टर्स काढून टाकण्यात आले होते. पोस्टर्स फाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रॅली दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाह यांना काळे झेंडे दाखवले होते. यावेळी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. अमित शाह यांच्या रॅलीमध्ये झालेल्या संघर्षात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती.