नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यावेळी निवडून आलेल्या आमदारांमध्ये काही असे चेहरेही होते ज्यांचे पक्षात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे त्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात होती. मात्र, केजरीवाल यांच्या जुन्या मंत्रिमंडळालाच पुढे कायम ठेवले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
या नेत्यांबाबत सुरू होत्या चर्चा..
पक्षाच्या महत्त्वपूर्ण नेत्या अतिशी मार्लेना, तिमारपूर मतदारसंघातून निवडून आलेले दिलीप पांडेय, राजेंद्र नगर मतदारसंघातून निवडून आलेले राघव चड्ढा आणि ओखलामधून भरघोस मताधिक्याने निवडून आलेले अमानतुल्लाह खान यांना नव्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपच्या मंत्रिमंडळामध्ये कोणताही बदल होणार नाही. अरविंद केजरीवाल यांचे मत आहे, की ज्या चेहऱ्यांना पाहून दिल्लीकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, आणि मतदान केले, त्यांनाच कायम ठेवणे योग्य आहे. मागील पाच वर्षात आप सरकारने ज्याप्रमाणे काम केले, तसेच काम पुढील पाच वर्षांतही करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासहित सात मंत्री आहेत. यांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, राजेंद्र पाल गौतम आणि इमरान हुसैन यांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर हे सर्व मंत्री पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतील.
हेही वाचा : धक्कादायक! दिल्लीत एकाच घरात सापडले ५ जणांचे मृतदेह