चेन्नई - भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (आण्णा द्रमुक) यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष तामिळनाडू आणि पद्दुचेरीमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहेत. आण्णा द्रमुकच्या साहाय्याने तामिळनाडूत पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे बोलले जात आहे.
आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचे जागावाटप निश्चित झाले आहे. तामिळनाडूतील ३९ लोकसभा जागांपैकी अण्णा द्रमुक ३४, तर भाजप ५ जागांवर लढेल. पद्दुचेरीमध्ये एका जागेवर भाजप आपला उमेदवार देईल. जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम म्हणाले, की आण्णा द्रमुक आणि भाजपची आघाडी निश्चित विजयी होईल.
या बैठकीला भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. ते म्हणाले, की आम्ही मध्यावधी निवडणुकीत आण्णा द्रमुकला मदत करणार आहोत. तामिळनाडूमध्ये आम्ही पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली लढू. राज्यात पलानीस्वामी, तर केंद्रात नरेंद्र मोदी हे आमचे सूत्र आहे. पट्टली मक्कल कटची (पीएमके) हा पक्षही या आघाडीत सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या तामिळनाडू विधानसभेत आण्णा द्रमुकचे ११५ सदस्य, द्रमुकचे ८८, काँग्रेसचे ८ तर इतर २ सदस्य आहेत.