पाटणा - पंतप्रधान मोदी यांची आज बिहारच्या दरभंगा येथे सभा होती. या सभेतील एका दृष्याने एनडीए पक्षाच्या अंतर्गत संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यासपीठावरच पंतप्रधान मोदी यांना प्रतिसाद देणे टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर सर्व पक्ष उर्वरित टप्प्यांसाठी तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमिवर मोदींची आज दरभंगा येथे सभा होती. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला फैलावर घेतले. तसेच राजदच्या उमेदवाराने वंदे मातरम या घोषणेचा विरोध केल्यावरून मोदींनी त्याच्यावर घणाघात केला. तसेच व्यासपीठावरून स्वतः वंदे मातरमच्या घोषणा देऊ लागले.
मोदी जेंव्हा वंदे मातरमच्या घोषणा देत होते त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित आघाडीतील सर्व नेत्यांनी हात उंच करून त्यांना प्रतिसाद दिला. मात्र, नितीश कुमार यांनी वंदे मातरम म्हणणे तर टाळलेच, शिवाय कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या या वागण्यामुळे बिहार येथील एनडीएच्या आघाडीमध्ये खिळ बसली का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या व्यवहारामुळे अनेक लोक असहमतीच्या नजरेने पाहत आहेत. तसेच या घटनेवर एनडीए पक्षातील कोणत्याच नेत्यांनी उत्तर देणे टाळले आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांवर निवडणुकींची सुत्रे टीकलेली आहेत. त्यांच्या या वागण्यानंतर चर्चेला तोंड फुटले आहे.